मेळघाटात सतत मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असून अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसापासून तीनही प्रकल्पाची दरे उघडण्यात आली आहेत.
परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मेळघाटात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने चंद्रभागा प्रकल्पाचे तीनही दरवाजे २८ ऑगस्टपासून १० सेंटिमीटरने उघडण्यात आले असल्याची माहिती सहायक अभियंता ओंकार पाटील यांनी दिली.
शहानूर प्रकल्पाची चारपैकी दोन दारे १० सेंटिमीटरने, तर दोन दारे पाच सेंटिमीटरने शुक्रवारपासून उघडण्यात आली असल्याचे सहाय्यक अभियंता सोमेश आडे यांनी सांगितले. सापन प्रकल्पाचे तीनपैकी दोन दारे २८ ऑगस्टपासून दहा सेंटिमीटरने उघडण्यात आली असल्याची माहिती सहायक अभियंता आशिष राऊत यांनी दिली.
मुसळधार बरसला प्रकल्प भरले
मेळघाटसह अचलपूर तालुक्यातही दमदार पावसाने गत आठवडाभर हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत असताना प्रकल्पात जलसाठा वाढल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडण्यात आली आहेत. मागील सहा सात दिवसापासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अचलपूर तालुक्यातील विविध नदी नाल्यांमध्ये दुथडी भरून ते वाहत आहेत.
सर्तकतेचा इशारा
बाप्पांचे विसर्जन शहानूर सापण व चंद्रभागा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने बिच्छन चंद्रभागा परिसरातील पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने गणपती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना नदीच्या काठावरूनच करावे लागले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला तसेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.