Join us

यंदाही महाराष्ट्रातील 'ह्या' छोट्याशा गावात पडला देशातील सर्वाधिक पाऊस; रेकॉर्ड कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:06 IST

२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या या गावाने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शिराळा (जि. सांगली): देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंजने यावर्षीच्या पर्जन्यमानात चेरापुंजीवर मात केली आहे.

इतकेच नाही, तर राज्यातील अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर आणि वलवण या ठिकाणांही मागे टाकत पाथरपुंज पावसाचे नवे 'माहेरघर', म्हणून उदयास येत आहे

२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या पाथरपुंजने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

याच काळात मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे.

केवळ मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत प्रचंड आहे.

आजपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीपाथरपुंज : ६,८१३ मिमीदाजीपूर : ५,९९२ मिमीवलवण : ५,९११ मिमीजोर : ५,६१२ मिमीनवजा : ५,३६० मिमीगगनबावडा : ५,२४२ मिमीमहाबळेश्वर : ५,१३६ मिमीकोयना : ४,३२१ मिमी.या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पाथरपुंजने इतर सर्व ठिकाणांपेक्षा आघाडी घेतली आहे.

पाथरपुंज व चेरापुंजी (१ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ अखेर पर्जन्यमान मी. मी.)पाथरपुंज - ६,८१३चेरापुंजी - ३,९७५.१०

चेरापुंजीचे रेकॉर्ड धोक्यात?◼️ चेरापुंजीच्या नावावर सर्वाधिक पावसाचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. एकेकाळी (ऑगस्ट १८६० ते जुलै १८६१) येथे २६,४७१ मिमी पावसाची नोंद झाली होती.◼️ मात्र, अलीकडच्या वर्षांत पाथरपुंजमध्ये सातत्याने पडणाऱ्या विक्रमी पावसाला पाहता, हवामान बदलाच्या या काळात पर्जन्यमानाचे केंद्र पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे.◼️ २०१९ मध्येही पाथरपुंजने चेरापुंजीला मागे टाकले होते. हाच कल कायम राहिल्यास, देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून लवकरच पाथरपुंजचे नाव कोरले जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

टॅग्स :हवामान अंदाजपाऊससांगलीमहाराष्ट्रभारतकोयना धरणमहाबळेश्वर गिरीस्थान