Join us

देशातील चौथी मोठी असलेली हि नदी सध्या मरणासन्न अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 1:01 PM

कृष्णा नदीसह देशभरातील सर्व नद्या सध्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. शासकीय स्तरावर आखल्या जाणाऱ्या योजना कुचकामी आहेत. 'रोग एक ...

कृष्णा नदीसह देशभरातील सर्व नद्या सध्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. शासकीय स्तरावर आखल्या जाणाऱ्या योजना कुचकामी आहेत. 'रोग एक अन् इलाज दुसरा अशी या योजनांची अवस्था आहे.

मरणासन्न अवस्थेतील या नद्यांना वाचवायचे असेल तर योग्य डॉक्टर, योग्य उपचारपद्धतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पावले पडली तरच या नद्यांना वाचविता येईल. अन्यथा नद्यांचे मरण बघत बसण्याखेरीज माणसाच्या हाती काहीच राहणार नाही, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी 'लोकमत लोकदरबार' कार्यक्रमात व्यक्त केले.

सांगलीतील 'लोकमत'च्या कार्यालयात कार्यक्रम झाला, यावेळी नदीप्रदूषण, महापूर, जैवविविधतेवर आलेले संकट, कुचकामी ठरणाऱ्या शासकीय यंत्रणा, योजनांचे गैरनियोजन आदी विषयांवर राणा यांनी परखड मते मांडली.

ते म्हणाले, 'अन्य देशांतील नद्यांशी तुलना करता भारतातील नद्यांमध्ये जलशुद्धीकरणाची नैसर्गिक क्षमता सर्वाधिक आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश, जंगल, माती व दगडांमधील गुणधर्म आदी घटकांमुळे भारतातील नद्या केवळ ४५ किलोमीटर अंतरातच जलशुद्धीकरण करतात, विदेशातील नद्यांना यासाठी शंभरहून अधिक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तरीही आपल्याकडील नद्यांचे प्रवाह सुरक्षित नाहीत. त्यांच्यात अडथळे आणले जात आहेत.'

ते म्हणाले की, 'पाण्याचा सर्वाधिक उपसा कृष्णा नदीतून होत असल्याने ती नैसर्गिकरीत्या सतत प्रवाही राहू शकत नाही. त्यामुळे तिच्यातील नैसर्गिक शुद्धीकरणाची क्षमता नष्ट होत आहे. कृष्णा नदी आता समुद्राला जाऊन मिळत नाही. समुद्रापर्यंत जाईपर्यंतच तिचा प्रवाह आटतो. त्यामुळे कृष्णा नदीला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.'

कृष्णा नदीला वाचविणे सोपी गोष्ट नाहीदेशातील चौथी मोठी नदी असलेली कृष्णा सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. वाढते प्रदूषण अन् वाढत्या पाणी उपशामुळे तसेच प्रवाहामध्ये येणारे अडथळे यांचा परिणाम नदीच्या अस्तित्वावर होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीला वाचविणे ही आता सोपी गोष्ट राहिलेली नाही, असे राणा यांनी सांगितले.

देशातील ३७ टक्के भूभागावर पूरस्थितीदेशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी एकूण चार राज्यांमधील एक टक्का भूभागाचर पूर येत होता. सद्यस्थितीत देशातील ३७ टक्के जमिनीवर पूरस्थिती निर्माण होते. देशातील रस्ते, महामार्गांचे जाळे तसेच नदीपात्रावर वाहणारे पूल याला कारणीभूत आहेत. नदीपात्राला बाधा न आणता नदीच्या सोयीने रस्ते विकास केला असता तर संकटांना तोंड द्यावे लागले नसते.

अतिक्रमणे, पुलांच्या भरावामुळे महापूर नदीपात्रातील अतिक्रमणोंमुळे तसेच पुलांच्या भरावामुळे महापुराची तीव्रता वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणा पूल बनवताना रस्त्याच्या सोयीचा विचार करते, मात्र नदीच्या प्रकृतीचा विचार करत नाही. ही मानसिकता बदलायला हवी, असे राणा म्हणाले.

टॅग्स :नदीमहाराष्ट्रपाणीप्रदूषणशेतीपर्यावरणजंगलजल प्रदूषण