राधानगरी : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी धरण १०० टक्के भरले, रात्री १० वाजता दोन व अकरा वाजता १ असे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले.
स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीमध्ये प्रतिसेकंद ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात दिवसभरात ३७ मिलिमीटर पाऊस झाला.
शुक्रवारी सकाळपासून पावसाचा काहीसा जोर पाहावयास मिळत आहे. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांत पावसाचा जोर होता.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. तसेच धरण परिसरात सोसाट्याचा वारा सुरू आहे. दिवसभरात धरणात ०.११ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५४.१ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे.
रात्री आठ वाजता पंचगंगा नदीची पातळी २३.५ फुटांपर्यंत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ११ मालमत्तांची पडझड होऊन २.२० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सद्या धरणात ८.२४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
२५ जुलैचा योगायोग◼️ गतवर्षीही २५ जुलै रोजी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे उघडले होते आणि यावर्षी देखील २५ जुलैला धरण भरले आणि स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत.◼️ २० जुलैपासून सर्व्हिस गेट बंद आहेत. जवळपास एक महिन्यापासून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून नदीपात्रात रोज १५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. जर हा विसर्ग सुरू केला नसता, तर जूनअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले असते.
नऊ धरणे तुडुंबआतापर्यंत जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब झाली आहेत. त्यामुळे येथून विसर्गही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. कोदे, धामणी, सर्फनाला, आंबेओहोळ, जांबरे, घटप्रभा, जंगमहट्टी, चित्री, पाटगाव, कडवी ही धरणे भरली आहेत.
अधिक वाचा: PM Kisan Update : नवीन शेतजमीन खरेदी केल्यास 'पीएम किसान' योजनेचा लाभ घेता येतो का? काय आहे नियम?