प्रमोद साळवे
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाअभावी पाणीउपसा वाढला असून, जलसाठ्चात लक्षणीय घट झाल्याची स्थिती आहे. मासोळी प्रकल्पात भर पावसाळ्यात केवळ १६ टक्केच जिवंत जलसाठा सद्यःस्थितीत आहे. त्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदा दमदार पाऊस पडेल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपती घेतली. सद्यःस्थितीत तालुक्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाात शेतकऱ्यांनी खते, बी बियाणे, शेत मशागतीवर खर्च केला. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
दुसरीकडे तालुक्यातील जलसाठे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिना संपत आला, तरी मासोळी धरणासह तांदूळवाडी, नखतवाडी, राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री या लघु प्रकल्पांत, तसेच पिंपळदरी साठवण तलावात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. परिणामी शेतकरी, ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. मासोळी मध्यम प्रकल्पात १६ टक्के जिवंत पाणीपुरवठा उपलब्ध आहे. गंगाखेड शहरासह मासोळी परिसरातील बारा गावांना पाणीपुरवठा व सिंचनासाठी मासोळीची मदत होते.
तलावांची अंदाजित साठवण क्षमता
कोद्री ४१०० हेक्टर, नखतवाडी-२८० हेक्टर, पिंपळदरी - ४१० हेक्टर, राणीसावरगाव ४४५ हेक्टर. तांदूळवाडी -४१० हेक्टर टाकळवाडी- ४०० हेक्टर असे साधारण तालुक्यातील जवळपास २४०० हेक्टर शेत जमीन सिंचन क्षेत्रात असल्याची प्रशासकीय माहिती आहे.
'मासोळी'ची उंची लालफितीत अडकली
सन १९७२ ला मंजूर असलेला मासोळी मध्यम प्रकल्प १९८२ प्रत्यक्षात आला. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितीत आहे. अनेक पाठपुरावे झाले. अनेकदा प्रशासकीय मंजुरी, सुधारित प्रशासकीय मंजुऱ्याही झाल्या. परंतु शासन-प्रशासन पातळीवर उंची वाढवणे संदर्भात नवनवीन प्रयोग झाले. मात्र, गत २० वर्षांपासून मासोळी मध्यम प्रकल्प धरणाची उंची वाढवण्याचा विषय प्रशासकीय स्तरावर लालफितीत अडकलेला आहे.
५०% टक्के पावसाची तूट
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. पिकांची वाढ खुंटलेली आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा असाच खंड राहिला, तर पिके नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून-जुलै महिन्यात ६६ मिमी पाऊस झालेला आहे. तालुक्यात सद्यःस्थितीत ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर ५० टक्के पावसाची तूट असल्याची शासनदफ्तरी नोंद आहे.
मासोळी धरण पाणीसाठा क्षमता (दलघमी)
मृत पाणीसाठा - १६.९४०
जिवंत पाणीसाठा - २७.१४१
मासोळी प्रकल्पातील जलसाठा (दलघमी)
आजची पाणी पातळी - ४१०.४४
एकूण पाणीसाठा - ११.३८८
जिवंत पाणीसाठा - ४.४४८
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी