Join us

अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर कोणताही धोका नाही केवळ आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील नेते करताहेत आरोप - संगमेश निराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 18:10 IST

अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख संगमेश निराणी यांनी अथणी येथे पत्रकार बैठकीत केली.

अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख संगमेश निराणी यांनी अथणी येथे पत्रकार बैठकीत केली. अलमट्टी धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणीसाठा करणारच याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

निराणी म्हणाले, बच्छावत आयोगाच्या निर्णयानुसार कर्नाटकने आपल्या वाट्याच्या पाण्याचा वापर अद्याप केलेला नाही. अलमट्टीची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवल्यानंतर धरणक्षेत्रातील आणखी ७० हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. या बाधित जमिनीला नुकसानभरपाई देण्यास कर्नाटक सरकार विलंब करत आहे.

त्यामुळेच धरण ५२४ मीटरपर्यंत भरण्यात अडथळे येत आहेत. कर्नाटकच्या वाट्याचे १३० टीएमसी पूर्णपणे वापरात आणणार आहोत. निराणी म्हणाले, उत्तर कर्नाटकवर सिंचनाच्या बाबतीत सतत अन्याय होत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सिंचनासाठी ३ लाख कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यातील ३५ टक्के निधी पाणी योजनेसाठी राखीव ठेवला जातो. परंतु,कर्नाटकात मात्र पाणी योजनांसाठी ७० हजार कोटींची तरतूद असतानाही त्यापैकी फक्त ६ टक्के निधी पाणीसाठ्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यातून योजना पूर्ण कशी होणार? हा प्रश्न आहे. आप्पासाहेब अवताडे, नानासाहेब अवताडे उपस्थित होते.

दोन्ही राज्यांची सरकारे गेली, योजना फसली

• माजी आमदार महेश कुमठळ्ळी म्हणाले, मी आमदार असताना तत्कालिन पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून विकत पाणी घेण्याऐवजी पाण्याच्या देवघेवीचा उपाय सुचवला होता.

• गरजेवेळी महाराष्ट्राने कर्नाटककडून जत भागासाठी पाणी घ्यावे आणि आमच्या गरजेवेळी कोयनेतून अथणी, जमखंडी, कागवाड तालुक्यांसाठी पाणी सोडावे, असा पर्याय सुचवला होता. त्यावर एकमतही झाले होते. यादरम्यान दोन्ही राज्यांची सरकारे गेल्याने हा उपाय बासनात गुंडाळला गेला. पण, अजूनही या पर्यायावर विचार होऊ शकतो.

हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

टॅग्स :कर्नाटकमहाराष्ट्रकोल्हापूर पूरपाणीधरणनदीशेती क्षेत्र