जळगाव जिल्ह्यातीलपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरण येथून बिगर सिंचन वापरासाठी सोडण्यात आलेल्या चौथ्या आवर्तनाचे पाणी कानळद्यासह तापी नदी संगमापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गिरणा नदीपात्रात पिण्यासाठी आवश्यक तेवढा जलसाठा निर्माण झाला असून, जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आवर्तनामुळे नदीकाठच्या विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. विशेषतः गिरणा नदीलगतच्या गावांमध्ये विहिरींना पुन्हा जीवदान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
• चौथ्या आवर्तनाची सुरुवात १५०० क्युसेक विसर्गाने करण्यात आली होती. मात्र, पाण्याची वाढती गरज लक्षात घेता विसर्ग वाढवून २००० क्युसेक करण्यात आला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तसेच गिरणाकाठच्या गावांवर झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.
• दरम्यान, या आवर्तनातून केवळ ग्रामीण भागालाच नव्हे तर, औद्योगिक क्षेत्रालाही लाभ झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत एमआयडीसी चाळीसगाव तसेच भडगाव व पाचोरा नगरपालिकांच्या मागणीनुसार हे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे संबंधित औद्योगिक आस्थापनांनाही आवश्यक जलसाठा उपलब्ध झाला आहे.
• आता चौथ्या आवर्तनातील विसर्ग बंद करण्यात आला असला तरी या कालावधीत नदीपात्रात साठलेले पाणी पुढील काही काळासाठी पुरेसे ठरणार आहे. प्रशासनाच्या या नियोजनामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चौथ्या आवर्तनामुळे गिरणा नदीसह बंधाऱ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीकाठासह अन्य गावांमधील संभाव्य पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. त्यामुळे शेकडो गावांतील ग्रामस्थांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. - विजय जाधव, उपविभागीय अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
