पावसाळ्यात वाहून येणाऱ्या माती आणि दगड-गोट्यांमुळे राज्यातील जलप्रकल्पांची साठवणूक क्षमता कमालीची घटली आहे. भविष्यातील पाण्याचे संकट आणि सिंचनाचा प्रश्न लक्षात घेता, राज्य मंत्रिमंडळाने १४ मे रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील काही प्रमुख धरणांमधील गाळ काढण्याच्या सुधारीत धोरणास मंजुरी दिली आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हतनूर व गिरणा धरणांचाही समावेश आहे. राज्यातील अनेक मोठ्या प्रकल्पांमधील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
राज्यातील इतर मोठ्या प्रकल्पांसह आता जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हतनूर व गिरणा या दोन्ही धरणांमध्ये साचलेला गाळदेखील आता काढण्यात येणार आहे.
हतनूर धरणातील गाळ काढण्याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासून मागणी केली जात होती. अखेर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे.
जल पातळीला होणार फायदा
• जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या धोरणात स्थानिक स्वराज्य संस्था, शेतकरी गट, सहकारी संस्था आणि खासगी यंत्रणांना सहभागी करून घेतले जाणार आहे. धरणातील हा गाळ शेतीसाठी अत्यंत सुपीक असल्याने तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढेल.
• तसेच यामुळे सिंचन, पिण्याचे पाणी आणि भूजल पुनर्भरणाला मोठा वेग मिळणार आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाच्या स्थितीवर या गाळ उपशाची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. हतनूर धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेसाठी मोठा खर्चदेखील लागणार आहे.
हतनूर धरणात ५४ टक्के गाळ...
• 'मेरी' या संस्थेने मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची बाब समोर आली होती. हतनूर धरणाच्या पाण्यावर मुक्ताईनगर, रावेर, यावल, भुसावळ, जळगाव, चोपडा या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्यासह हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.
• या धरणातील मूळ पाणी साठवण क्षमता ३८८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत धरणात तब्बल २०८ दशलक्ष घनमीटर गाळ साचला आहे. म्हणजेच धरणाचा ५४ टक्के भाग गाळाने व्यापला असून, प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आला आहे.
गिरणा धरणालाही मिळणार संजीवनी
नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. शासनाच्या या नवीन मोहिमेअंतर्गत गिरणा धरणातील गाळ आणि गाळमिश्रित वाळूदेखील बाहेर काढली जाणार आहे. यामुळे धरणाची सिंचन क्षमता पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
