नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरी, पाणवठे व इतर जलस्रोत आटू लागल्याने भाजीपाला पिकांच्या उत्पादनाला याचा फटका बसत आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवू लागल्याने उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पहायला मिळत आहे.
परिणामी नांदूरमधमेश्वर येथून नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना नवसंजीवनी असणाऱ्या तीनही कालव्यांना उन्हाळ्यातील पिण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी बातमी दि.१८ रोजी 'लोकमत'ने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दोन दिवसांत तत्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाने तीनही कालव्यांना दि.२० रोजी तीस दिवसांचे पाण्याचे आवर्तन सोडले आहे.
निफाड तालुक्यातील महत्त्वाचे असणारे नांदूरमधमेश्वर धरण क्षेत्रातून सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, राहता, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांसह शिर्डी व अहिल्यानगरसाठी वरदान ठरलेल्या नांदूरमधमेश्वर येथून सोडण्यात येणाऱ्या तीनही कालव्यांचे पहिले आवर्तन मार्च महिन्यात सोडण्यात आले होते.
एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शेतकरी उन्हाळी पिके वाचविताना संकटात सापडला आहे. तीनही कालव्यांना तीस दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने पाण्याचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे.
सिन्नरचा पूर्व भाग पाण्यासाठी चिंतित
सिन्नरचा पूर्व भाग पाण्यासाठी चिंतित झाला असून दुष्काळी झळा जाणवू लागल्या आहेत. शेतकरी वर्गाला पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे
पहिले तीस दिवसांचे आवर्तन फेब्रुवारी, मार्चमध्ये सोडण्यात आले होते. मात्र वाढते ऊन, पिण्याच्या पाण्याची स्थिती बघता दहा दिवस अगोदर आवर्तन सोडण्यात आले आहे.
- सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, नाशिक.
शेततळ्यात प्लॅस्टिक अस्तर बसविण्यासाठी आकारमाननिहाय किती अनुदान मिळते, वाचा सविस्तर
