Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुळा उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू; अजून किती दिवस सुरु राहणार पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:47 IST

mula canal water सध्या लाभक्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी वाढली होती.

मुळा धरण लाभक्षेत्रातील उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी आणि वाढती उन्हाची तीव्रता विचारात घेता उन्हाळी हंगामासाठी २९ एप्रिल आजपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

सध्या लाभक्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी वाढली होती.

यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून उन्हाळी आवर्तन सुरू करण्याची विनंती केली होती.

या आवर्तनाचा लाभ राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला होणार आहे.

हे आवर्तन ४० दिवसांचे राहणार असून त्यासाठी ४.८ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी तातडीने निर्णय घेत आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही, शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल आणि योग्य नियोजन केले जाईल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचेही आमदार लंघे यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या तोंडावर सुटणाऱ्या या आवर्तनामुळे पिकांना जीवनदान मिळणार असून गावपातळीवरील नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.

शेतकऱ्यांना दुहेरी आनंदरब्बीचा शेवट आणि खरिपाच्या मशागतीच्या तोंडावर बुधवारी नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले. त्यातच आवर्तन सुटण्याची सुखद बातमी मिळाल्यानंतर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश

टॅग्स :धरणपाणीशेतीशेतकरीपीकअहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटीलरब्बीखरीप