Join us

Solapur Mahapur : सोलापूर जिल्ह्यातील 'चांदणी' नदीला महापूर; १० हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:21 IST

मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे.

बार्शी: मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे.

यामुळे पाच ते सहा गावांतील सुमारे दहा हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात या पावसाची सरासरी ४७ मिमी एवढी नोंद झाली आहे.

यावर्षी तालुक्यात सरासरी दोनशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि आणखीन ही पाऊस पडतच आहे. शनिवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसांत बार्शी तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाल्याने मंगळवारी मध्यरात्री नदीला मोठा महापूर आला.

त्यामुळे नदीवरील बेलगाव, आगळगाव, धस पिपळगाव नवीन पूल, देवगाव, मांडेगाव कांदलगाव, शिरसाव, वाकडी हे पूल तर पाण्याखाली गेले.

त्याचबरोबर महापुरामुळे नदीपात्रातून पाणी बाहेर येऊन आगळगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, देवगाव, धस पिंपळगाव आणि शेवटी असलेल्या कांदलगावमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मका, कांदा, ऊस या पिकांमधून पाच ते सात फूट पाणी वाहत आहे.

या पुराच्या पाण्याने कांदलगाव येथील नरसिंह मंदिरालादेखील वेढा घातला आहे. गावातील अनेक घरासह अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्येदेखील पाणी शिरले आहे.

पाणी वेगाने वाहत असून, सुमारे दोन ते तीन किमी परिसरात जिकडे पाहावे तिकडे पाणीच दिसत असून, अप्रत्यक्षपणे तलाव असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चांदणीसोबतच सिरसाव (ता. परांडा) येथील नदीलाही असाच मोठा पूर आलेला आहे. या दोन नद्यांचा हिंगणगाव येथे संगम होत असल्याने पाण्याला पुढे वाट मिळत नाही. त्यामुळे फुगवटा तयार झाला आहे.

चांदणी नदीपात्रात १९ हजार विसर्ग◼️ बुधवारी सकाळी ९ वाजता चांदणी धरणाचे एकूण २८ स्वयंचलित गेटपैकी २५ स्वयंचलित गेट उघडले आहेत. १९६७१ क्युसेकने चांदणी नदीपात्रात विसर्ग चालू आहे.◼️ तसेच चांदणी धरणात येणारा विसर्ग विचारात घेता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतकरी व नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन परांडा पाटबंधारे विभागाने केले आहे.

बार्शीत पावसामुळे १ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान◼️ बार्शी तालुक्यात मागील काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, कांदा तसेच फळपिके व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.◼️ सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रातील शेती पिके बाधित झाली असून शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत.◼️ गावभेटीदरम्यानही नुकसान स्पष्टपणे दिसून आले असल्याचे नमूद करून पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

अधिक वाचा: Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी

टॅग्स :सोलापूरपीकपाऊसशेतकरीशेतीपूरपाणीराज्य सरकारसरकारनदी