गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वान (हनुमान सागर) आणि काटेपूर्णा धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी संध्याकाळपर्यंत वान धरणात ४३.४५ टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, गतवर्षीच्या तुलनेत १५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
काटेपूर्णा प्रकल्पातही ४३.७९ टक्के साठा असून, तोदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वान धरण हे अमरावती, अकोला व बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले असून, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे १४० गावांचा पाणीपुरवठा याच धरणावर अवलंबून आहे. अकोट, तेल्हारा (अकोला), शेगाव, प संग्रामपूर आणि जळगाव जामोद (बुलढाणा) तालुक्यांतील गावांना भूमिगत जलवाहिनीमार्फत शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.
गेल्यावर्षी २७जुलै २०२४ रोजी वान धरणात २८.३२ टक्के जलसाठा होता, तर यंदा तो ४३.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता धरणाची जलपातळी ३९९.१० मीटर इतकी होती. पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
काटेपूर्णा प्रकल्प अकोला जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अकोला शहर व मूर्तिजापूर तालुक्यातील गावांना याच धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. गेल्यावर्षी याच दिवशी (२७ जुलै २०२४) काटेपूर्णात ३९.५५ टक्के जलसाठा होता.