Join us

भाटघर, वीर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:22 IST

नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.

नातेपुते : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्येपाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.

विशेषतः वीर धरण ७४ टक्क्यांहून अधिक भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ३ जुलै जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून धरणातून सांडव्याद्वारे ५८०७ क्युसेक विसर्ग व विद्युतगृहाद्वारे १४०० विसर्ग असा एकूण ७२१४ क्युसेकने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भाटघर धरणात २३ टीएमसी क्षमतेपैकी १३.३० टीएमसी (५६.५८%), वीर धरणात १० टीएमसीपैकी ६.९९ टीएमसी (७४.२७%), नीरा देवघर धरणात १२ टीएमसीपैकी ५.१० टीएमसी (४३.५०%) आणि गुंजवणी धरणात ४ टीएमसीपैकी २.५६ टीएमसी (६९.३८%) इतका पाणीसाठा झाला आहे.

चारही धरणांचा एकूण साठा सुमारे ५७.८३ टक्के झाला आहे. भाटघर परिसरात २४ तासांत २६ मिमी, वीर परिसरात ०५ मिमी, नीरा देवघर परिसरात ५० मिमी आणि गुंजवणी परिसरात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वीर धरणातून २३ जूनपासून उजवा कालव्यास ६०० तर आणि डावा कालव्यास १२०४ या मार्गे पाणी सोडण्यात आले आहे. याचा उपयोग कालव्यावरील गावांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी होणार आहे.

पावसाचे प्रमाण पाहता विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीपात्रातील जनावरे, साहित्य तत्काळ हलवावे, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नीरा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.

अधिक वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :धरणपाणीपुणेनदीपाऊसशेती