अहिल्यानगर : जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा.
वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
अधिक वाचा: दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त