Join us

Rain Alert : मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार; राज्यात ५ दिवस अतिवृष्टीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 09:21 IST

Maharashtra Weather Update : राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी पावसाचाही जोर वाढला. २१ ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.

राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी पावसाचाही जोर वाढला. २१ ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट व गडगडाटासह पाऊस पडू शकतो. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, समुद्रात खवळलेली स्थिती राहील. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीत नागरिकांना 'सचेत' ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नद्यांना पूर, खबरदारीच्या सूचना

रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने थोका पातळी, तर कुंडलिका नदी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. पूरस्थितीपासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या असून, खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : वहिवाट, शेतरस्ता होणार मोकळा होणार; शेतकऱ्यांना मोफत पोलिस बंदोबस्त देण्याबाबत गृह विभागाचा मोठा निर्णय

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रमराठवाडापाणीशेती क्षेत्र