Join us

धानाची शेती पाण्याखाली येण्याची शक्यता; ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:30 IST

सततच्या पावसामुळे रामटेक शहरालगत असलेले ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय १०० टक्के भरले असून, ते निर्मितीपासून आजवर अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो' झाले आहे.

सततच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरालगत असलेले ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय १०० टक्के भरले असून, ते निर्मितीपासून आजवर अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो' झाले आहे.

या जलाशयाला पंचाळा (ता. रामटेक) शिवारात नैसर्गिक सांडवा (सलांग) असून, शनिवारी (दि. २७) सकाळी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नदीत पाण्याची आवक वाढत असल्याने काठावरील धानाची शेती पाण्याखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रिटिशांनी या जलाशयाच्या निर्मितीला सन १९०६ मध्ये सुरुवात केली होती. त्याचे संपूर्ण काम सन १९१३ मध्ये पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या जलाशयाला यावर्षी ११२ वर्षे पूर्ण झाले आहेत.

या ११२ वर्षांमध्ये खिंडसी जलाशय सन १९४५, १९६३, १९९२, १९९४, १९९७, २०११, २०१३, २०२२, २०२३, ४ सप्टेंबर २०२४ आणि २७ सप्टेंबर २०२५ असे ११ वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. हे जलाशय पूर्ण भरल्यानंतर त्यातील पाणी सोडले जात नसून, ते आपोआप पंचाळा शिवारातील सांडव्यावरून सूर नदीच्या पात्रात जाते.

पाण्याच्या विसर्गामुळे सूर व कपिला नदी दुभडी भरून वाहत आहे. आणखी पाऊस आल्यास जलाशयातील पाण्याचा विसर्ग वाढेल आणि सूर व कपिला नदीचे पाणी परिसरात पसरायला सुरुवात होईल. त्यामुळे नदी व नाल्याकाठी असलेल्या रामटेक तालुक्यात महादुला, पंचाळा, लोहारा या गावांच्या शिवारातील शेती आणि शेतातील धानाचे पीक पाण्याखाली येऊ शकते.

या जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तसेच तो काढला जात नसल्याने त्याची पाणीसाठवण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे बैंक वॉटरचा धोका वाढत असून, शेकडो एकर शेती पिकांसह पाण्याखाली येते. यावर उपाययोजना करून या जलाशयाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

पाणीसाठा क्षमता १०५.१२ दलघमी

खिंडसी जलाशयाची एकूण पाणीसाठा क्षमता १०४.१२ दलघमी असून, त्यातून दरवर्षी कमाल २८.२० दलघमी पाणी उपलब्ध होते. याच्या सांडव्याची एकूण लांबी १५७.७० मीटर असून, त्याची पाणी हवन क्षमता ५१४.६५३ घनमीटर प्रतिसेकंद एवढी आहे. रामटेक तालुक्यात १ जून ते २७ सप्टेंबर २०२५ या काळात २२६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील सरासरीच्या तुलनेत हा पाऊस कमी असला तरी जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे.

निर्मिती हेतू अपूर्ण

• ब्रिटिशांनी या जलाशयाची सिंचनासाठी केली होती. या जलाशयाची सिंचन क्षमता ८,९०३ हेक्टर ठरविण्यात आली होती.

• यातील पाण्यामुळे रामटेक तालुक्यातील ७० गावांमधील ४,४५२ हेक्टर आणि लगतच्या भंडारा जिल्ह्यातील ४० गावांमधील ४,४५१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचे तसेच ओलितासाठी दोनदा पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.

• खिंडसी जलाशय पैच जलाशयाला जोडले असले तरी त्याचा सिंचनासाठी काडीचाही उपयोग झाला नाही. या जलाशयाची बहुतांश पाणी पिण्यासाठी वापरले जाते.

हेही वाचा : शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

English
हिंदी सारांश
Web Title : Khindsi Reservoir Overflows, Threatening Paddy Fields After Heavy Rain

Web Summary : Heavy rains caused the British-era Khindsi reservoir near Ramtek to overflow for the eleventh time, potentially submerging paddy fields. Built in 1913, the reservoir's irrigation purpose remains largely unfulfilled, primarily serving drinking water needs. Silt accumulation reduces its water storage, increasing flood risks for nearby villages.
टॅग्स :विदर्भधरणपाणीनदीनागपूरशेती क्षेत्र