जायकवाडीतील जलसाठ्याच्या निकषात बदल करून ७ टक्के पाणीकपातीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटेल, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले, 'मेरी'ने (महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) ज्या पद्धतीने जायकवाडीतील बाष्पीभवनाची प्रक्रिया जास्त असण्यापेक्षा कमी केली आहे. अहवालात कमी बाष्पीभवन होत असल्याचे नमूद केले आहे. कमी बाष्प होत असल्यामुळे पाणीबचत होते, असे 'मेरी'ला दाखवायचे आहे.
जेणेकरून वरच्या धरणातून पाणी सोडावे लागणार नाही. कालव्याची गळतीत बाष्पीभवनाच्या आकड्यांचा खेळ करून मराठवाड्याचे पाणी कमी करण्याचा डाव आखला आहे काय? यावर पालकमंत्री म्हणाले, त्यांनी कसाही डाव आखला असेल तरी तो हाणून पाडण्यात येईल.
पाणी पळविण्याचा प्रयत्न
• जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा आता ६५ १ ऐवजी ५८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस 'मेरी' समितीने शासनाकडे केली आहे. याचा फायदा नाशिक व अहिल्यानगरला होणार असून, मराठवाड्याच्या वाट्याचे ७ टक्के पाणी पळविण्याचा हा प्रयत्न आहे.
• न्यायालयाने मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी अभ्यासगटाला दीड महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. 'मेरी'चे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांच्या अभ्यासगटाने समन्यायी पाणीवाटपाबाबत अभ्यास करून ऑक्टोबर २०२४ मध्ये अहवाल सादर केला.
• त्यात जायकवाडी धरणात पावसाळ्यानंतर पाणी सोडण्याच्या निकषात बदल करीत ६५ वरून ५८ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवण्याची शिफारस केली.
सूर्य तळपताना भेदभाव करतो का?
• मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार, २३.५ टीएमसी बाष्पीभवन होत असल्याचे नमूद होते. आता 'मेरी'च्या सात सदस्यीय अभ्यास गटाने ११.५ टीएमसी एवढेच बाष्पीभवन होत असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे जायकवाडीतील पाण्याची बचत होते.
• परिणामी, वरच्या धरणातून जायकवाडीतून पाणी सोडण्याची गरज राहणार नाही. उन्हाळ्यात सूर्य तळपताना मराठवाड्यात कमी तळपायचे आणि इतर भागात जास्त तळपायचे असा भेदभाव करतो की काय, असा सवाल यानिमित्ताने केला गेला.
• दरम्यान, खा. संदीपान भुमरे म्हणाले, पाणीवाटपाबाबत 'मेरी'ने दिलेल्या अहवालाचा बैठकीत विरोध करण्यात आला.