Join us

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेल्या राज्याच्या 'या' जिल्ह्यात पडतोय केवळ तुरळक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:04 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १६) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पण राज्याच्या गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत नसून तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १६) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पण, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत नसून तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. परिणामी, जिल्ह्यातील रोवणीच्या कामाचा वेग मंदावला असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात ९ ते ११ जुलैदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावत दीड महिन्याची पावसाची तूट भरून काढली. पण, ११ जुलैनंतर पाऊस पुन्हा गायव झाला. मंगळवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पण, दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. खरिपात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. पण, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ २० हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला होता. पण, यानंतर दमदार पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांचे रोवणीचे काम सुरू आहे. पण, वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे रोवणे पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १६) मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण, स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याने हवामान विभागाचा अंदाज फोल ठरत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा

पुजारीटोला - ६८.२५ टक्के

इटियाडोह - ५५.४७ टक्के

शिरपूर - ५२.५२ टक्के

कालीसरार - ५०.८१ टक्के

मागील २४ तासांत बरसलेला पाऊस

तालुकापाऊस (मिमी.)
गोंदिया११.२
आमगाव३.७
तिरोडा१७.८
गोरेगाव३.७
सालेकसा१४.९
देवरी१९.९
अर्जुनी-मोरगाव७.४
सडक-अर्जुनी५०.४

आरोग्यावर होत आहे याचा परिणाम

मागील पाच-सहा दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्हा गारेगार झाला होता. आता पाऊस थांबताच उकाडा वाढला असून, जीव कासावीस होऊ लागला बदलाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :विदर्भगोंदियाशेतकरीशेती क्षेत्रपाणीपाऊस