Join us

Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:52 IST

मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सातशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

अहिल्यानगर : मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सातशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करण्यात येणार आहे.

यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पूजा करून उजव्या कालव्यातून सोमवारी ७०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील उपस्थित होत्या.

ऊसतोडणी सुरू असल्याने गतवेळी बहुतांश शेतकऱ्यांना पाणी घेणे शक्य झाले नाही. त्यात उन्हाळाही सुरू झाला असून, पाण्याअभावी कांदा, ऊस, गहू, हरभरा आदी पिके करपू लागली होती.

त्यामुळे शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले असून, पुढील ४५ दिवस आवर्तन सुरु राहणार आहे.

या आवर्तनासाठी ५ दशलक्ष घनफूट पाणी राखीव आहे. लाभक्षेत्रातील २५ ते ३० हेक्टरला सोसायट्यांच्या माध्यमातून पाणी देण्यात येणार आहे.

उन्हाळी आवर्तन असल्याने आणखी मागणी वाढण्याची शक्यता असून, पाटबंधारे विभागाकडून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाकडून पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. 

पिकांना मिळणार जीवदान१) मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे.२) विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशा पिकांसह चारा पिकांनाही या पाण्याचा फायदा होणार आहे. तसेच उसालाही यामुळे जीवदान मिळणार आहे.

कालव्यातून पाईपद्वारे पाणी उपसा केल्यास कारवाईमुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन पुढील ४५ दिवस सुरू राहणार असल्याने सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल. तसेच नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. काही शेतकरी कालव्यातून पाईप व मोटारीने पाणी उपसा करतात. कालव्यात पाईप, मोटारी टाकल्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी काढून घ्याव्यात. पाईपद्वारे पाणी उपासा केल्याचे निदर्शनास आल्या कडक कारवाई केली जाईल, असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

४५ दिवस शेतीसाठी आवर्तन सुरु राहणारमूळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असून, शेतीसाठी ५ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. हे आवर्तन पुढील दीड महिना चालणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक वाचा: भविष्यात जमिन मोजणी होणार सोपी; आलं मोजणीचं नवीन जीआयएस आधारित 'व्हर्जन-२'

टॅग्स :शेतीशेतकरीपाणीधरणपीकरब्बीऊसहरभरागहूनेवासानदी