राहुरी : दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणात यंदाच्या वर्षी विक्रमी (४० हजार ६३८) पाण्याची आवक झाली.
मुळा धरण १०० टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे मुळा नदी जायकवाडीच्या दिशेने सलग ९१ दिवस वाहती राहिली. यामुळे जायकवाडीसाठी मुळातून पाणी सोडण्यात येणार नाही.
मुळा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर्षीचा पाणी प्रश्न मिटला आहे. २६ हजार साठवणक्षमता असलेल्या मुळाची सध्याची पाणीपातळी १ हजार ८१२ फूट इतकी आहे.
कोतुळ लहित खुर्द येथून १९ जून ते ४ ऑक्टोबरपर्यत आवक सुरू होती. तर धरणातून मुळा नदीपात्रामधील विसर्ग १० नोव्हेंबरला बंद करण्यात आला.
धरणात यंदाच्या वर्षी ४० हजार ६३८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले. १७ हजार ३०१ दशलक्ष घनफूट पाणी ११ वक्रकार दरवाजाद्वारे जायकवाडीला वाहून गेले.
कोतुळ येथे यंदाच्या वर्षी एकूण ५२६ मिलिमीटर, तर मुलानगर येथे ४०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील वर्षी डावा व उजव्या कालव्यातून चार तर वांबोरी चारीतून तीन रोटेशन शेतीसाठी देण्यात आले.
४० हजार दलघफूहून अधिक आवक
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात ४० हजारहून अधिक आवक झाली. नदी २१ दिवस ओसंडून वाहत होती. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामळे यंदाच्या वर्षीचा पाणीप्रश्न मिटला आहे. अशी माहिती धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
मागील ५ वर्षांचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)
२०२४ - २५ हजार ८८६
२०२३ - २३ हजार १८०
२०२२ - २६ हजार
२०२१ - २५ हजार ७६८
२०२० - २६ हजार
अधिक वाचा: अखेर 'त्या' बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली; राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकांचा आदेश
