दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरणातून बुधवारी (दि. ९) सायंकाळी ११ मोऱ्यांमधून जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले.
धरण प्रशासनाकडून सुरुवातीला तीन वेळेस सायरन वाजवल्यानंतर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
कोतुळ येथून मुळा धरणाकडे ४ हजार २२७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण परिसरात ४ पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी सायंकाळी १८ हजार १६९ दशलक्ष घनफूट (६९ टक्के) पाणीसाठ्याची नोंद झाली.
आतापर्यंत कोतुळ येथून मुळा धरणाकडे ९ हजार १८८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोतुळ येथून मुळा धरणाकडे ४ हजार २२७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे.
१८ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याप्रसंगी अभियंता विलास पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे, स्थापत्य सलीम शेख, सागर अवगुणे आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
विसर्ग कमी जास्त करणार
◼️ धरणाकडे ४ हजार २२७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या अकरा वक्राकार दरवाजांद्वारे ३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
◼️ आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी जास्त करता येईल.
◼️ १५ जुलैपर्यंत पाणी साठा १८ हजार १५५ ठेवायचा आहे. त्यानंतर ८९ टक्के धरण झाल्यानंतर पुन्हा पाणी सोडण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता, सायली पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर