नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात 'मान्सून'ने नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिरा म्हणजे गुरुवारी संपूर्ण देशातून निरोप घेतला. यंदा देशभरात सरासरी ८६८.६ मिमीच्या तुलनेत ९३७.२ मिमी म्हणजे ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्यानुसार जून-सप्टेंबर या काळात झालेल्या दमदार पावसानंतर आता ऑक्टोबरच्या उर्वरित काळात देशाच्या काही भागांत सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. या मोसमी पावसाने पाच वर्षांनंतर प्रथमच साधारण स्थितीतील तारखेपेक्षा ८ जुलै रोजी म्हणजे नऊ दिवस आधीच देश व्यापला होता.
२०२० मध्ये २६ जून रोजीच मोसमी पाऊस संपूर्ण देशात पोहोचला होता. मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो व ८ जुलैपर्यंत देश व्यापतो. १७ सप्टेंबरला ईशान्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो.
यंदा पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या भागांत मुसळधार पावसामुळे प्रचंड महापूर आले, भूस्खलनही मोठ्या प्रमाणात झाले.
ढगफुटी, अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. रस्ते मार्ग बंद झाले. जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले.
अधिक वाचा: निष्ठा असावी तर अशी! तब्बल ९ दिवसांपासून पाळीव कुत्र्याचा शेतकऱ्याच्या आठवणीत स्मशानभुमीतच मुक्काम