म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले. उन्हाळ हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरज-कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रब्बी-उन्हाळ हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी असल्याने आमदार सुरेश खाडे यांनी दोन दिवसांपूर्वी वारणाली पाटबंधारे कार्यालयात बैठक घेऊन म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या योजनेचे तीन टप्प्यात २३ पंप सुरू करून मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले. चार टप्प्यातील आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत.
कालव्यातून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल असेही आमदार सुरेश खाडे त्यांनी सांगितले. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने मिरजेसह तीन तालुक्यात खरीप हंगामात म्हैसाळचे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर होणार आहे. याचा बागायती पिकांना मोठा फायदा होणार आहे.
म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप सुरू करताना खाडे यांच्यासह खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व म्हैसाळ योजनेचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. खाडे यांनी म्हैसाळ सिंचन योजना सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
तीन तालुक्यात विविध गावातील कोरडे तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरल्याने उन्हाळ्यात त्याचा फायदा होणार आहे. आज सुरू करण्यात आलेले आवर्तन शेतकऱ्यांची मागणी असेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून व सुभाष रामू हिंगमिरे या शेतकऱ्याच्या हस्ते नारळ फोडून पहिल्या टप्प्यातील पंप सुरू झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाणी उपलब्ध केल्याबद्दल आमदार सुरेश खाडे यांचे आभार मानले.