आशपाक पठाण
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. पिण्यासह सिंचनासाठी जिल्ह्याला प्रमुख आधार असलेल्या मांजरा, तेरणा धरणासह सात मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. परिणामी, रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. २ सप्टेंबरपर्यंत ५५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जून ते सप्टेंबर ७०६ मिमी पावसाची सरासरी आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पावसाकडे लक्ष लागले आहे. लातूर जिल्ह्यासाठी मांजरा व तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. तर, मध्यम ८, लघु १३५ प्रकल्प आहेत.
मध्यम प्रकल्पात तावरजा, रेणा, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा प्रकल्पाचा समावेश आहे. या आठपैकी सात प्रकल्पांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मसलगा प्रकल्पात तांत्रिक कारणामुळे पाणीसाठा कमी ठेवला आहे.
लघु प्रकल्पात १७५ दलघमी पाणीसाठा
जिल्ह्यात १३५ लघु प्रकल्प आहेत. यात १७५.६८ दलघमी पाणीसाठा झाला आहे. यातील बहुतांश प्रकल्प अद्याप पूर्णपणे भरले नाहीत. या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ५५.९० टक्क्यांपर्यंत गेला आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वदूर पाऊस झाल्यास लघु प्रकल्पही शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमुळे विंधन विहिरी, विहिरींच्या पाण्यात वाढ होण्यास मदत होते. शिवाय, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही दूर होणार आहे.
६६ प्रकल्पांत १०० टक्के पाणी
लातूर जिल्ह्यास उपयुक्त असलेल्या मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम ८ व १३५ लघु प्रकल्पांमध्ये ५४२.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. यात मध्यम ८ पैकी ७, लघु १३५ पैकी ५७ व २ मोठे अशा एकूण ६६ प्रकल्पांत शंभर टक्के आहे. २७ लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असून, १५ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १३ लघु प्रकल्पांत अद्याप केवळ २५ टक्के पाणी आहे.
मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा
तावरजा | १०० |
रेणा | ९७.६५ |
व्हटी | १०० |
तिरू | १०० |
देवर्जन | १०० |
साकोळ | १०० |
घरणी | १०० |
मसलगा | १०.१५ टक्के |
कोणत्या तालुक्यांत किती पाऊस... (पाऊस मिमी)
लातूर | ४५४.८ |
औसा | ४६८.८ |
अहमदपूर | ६५९.८ |
निलंगा | ५०५.६ |
उदगीर | ६७१.३ |
चाकूर | ६१९.३ |
रेणापूर | ५७३.९ |
देवणी | ५४४.७ |
शिरूर अ. | ६४४.८ |
जळकोट | ५४६.४ |
एकूण | ५५८.२ |
उदगीरला सर्वाधिक पाऊस
लातूर जिल्ह्यात ५५८.२ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. अजून सप्टेंबर महिना शिल्लक असून, या महिन्यात जिल्ह्याची सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ व अहमदपूर तालुक्यांत झाला आहे.
सिंचन क्षेत्रात वाढ
लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी मांजरा धरण हे जीवनवाहिन्या आहेत. लातूर शहर पाणीपुरवठा, एमआयडीसी पाणीपुरवठ्यासह उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठीही या प्रकल्पातून पाणी दिले जाते.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र