Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे उष्णता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 10:05 IST

Maharashtra Weather Update : राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उष्ण हवामान आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उष्ण हवामान अनुभवता येत आहे. तर काही भागात अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे.

राज्यातील काही भागात दिवाळीत पावसाने हजेरी लावली होती. विशेषत: कोकणात अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत तापमानाचा पारा चढताना दिसत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (४ नोव्हेंबर) रोजी कोरडे हवामान राहणार आहे. मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे झालेल्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. याचा परिमाण हवामानावर झाला आहे. राज्यात म्हणावी तशी थंडीला अद्याप सुरुवात झाली नाही. काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

मुंबईत असे असेल हवामान

मुंबई, ठाणे व उपनगर भागात सध्या दमट व उष्ण वातावरण असून उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात देखील तापमानात वाढ झाली आहे. तर सकाळी आणि रात्री नागरिक हलका गारवा अनुभवत आहेत. उद्यापासून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.

थंडीसाठी पाहावी लागणार वाट

राज्यात अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. येत्या काही दिवसानंतर हळू हळू थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या काही दिवसांत तापमान काही अंशाने घट होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणासहित तापमान वाढले आहे.

कोकणात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात पावसाची शक्यता असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्यात ७ नोव्हेंबरपर्यंत पाऊस

मराठवाड्यात ७ नोव्हेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* थंडी वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. जेणे करून त्यांना थंडीचा त्रास होणार नाही.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडाविदर्भ