Join us

Maharashtra Weather Update  ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस ;  IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:34 IST

'फेंगल' चक्रीवादळामुळे राज्यात तापमान वाढीबरोबरच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'फेंगल' चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावर मोठा परिमाण झाला आहे. या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्याच्या प्रभावामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

किमान तापमानात देखील मोठी वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा अनुभव येतोय. मंगळवारी (३ डिसेंबर) उष्ण आणि दमट हवामान असल्याने नागरिक हैरान झाले होते.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतर भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान हे १७ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. 

रत्नागिरीमध्ये सर्वाधिक तापमान असून कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे देखील तापमान वाढले आहे. या सोबतच या ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. 

सांगली, सातारा, पाचगणी आणि महाबळेश्वर या जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणार आहे. तर काही भागात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूरसह घाटपरिसर, सातारा, सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात येत्या २४ तासात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात थंडी कमी झाली असून हवामान कोरडे व ढगाळ राहणार आहे.

८ ते १० डिसेंबरपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून त्यानंतर उष्णता व पाऊस कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात ३ ते ६ अंश सेल्सिअसचे तापमान वाढले आहे. तर रात्री साधारण २० ते २२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

थंडी गायब

चक्रीवादळाचा मुंबईच्या हवामानावर परिणाम झाला आहे. शहरात नागरिक उष्णतेने हैराण झाले आहे. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहणार असून ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडणार नसल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळातही थंडीचे प्रमाण कमीच राहणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाडीप बघून किटकनाशकाची फवारणी करावी.

* कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडापुणेचक्रीवादळ