Join us

Maharashtra Weather Update : आता थंडीचा जोर वाढणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:35 IST

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा चटका तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा चटका तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिणेतील काही राज्यामध्ये पावसाचे वातावरण कायम आहे. तमिळनाडू, तिरुपतीत पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाची शक्यता नसली तरी हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात काही भागांतून पावसाने माघार घेतली असून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी तापमानात घट झालेली दिसत आहे.

राज्यात ३ दिवसांच्या अवकाळी पावसाच्या संकटानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढत आहे. मुंबईचा पारा देखील काहीसा घसरला आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली घसरला आहे.

राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील काही दिवस संमिश्र हवामान असेल. ढगाळ हवामानाचा फटका शेती पिकांना आणि फळबागांना बसत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळूनवरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

* थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबड्याच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.तसेच कोंबड्याच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमहाराष्ट्रकोकणमुंबईमराठवाडापीक