Join us

Maharashtra Weather Update राज्यामध्ये पावसाचा जोर आता आणखी वाढणार; कुठे दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 09:47 IST

पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : मान्सूनने शुक्रवारी (दि. २८) देशातील आणखी काही भाग व्यापला आहे. त्यामध्ये दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगडचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने शनिवारी (दि. २९) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट दिला आहे. खान्देश आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

तसेच, शनिवारी (दि. २९) आणि रविवारी (दि. ३०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील घाटमाथा, पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

दरम्यान, शुक्रवारी मान्सूनने संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला आहे. तसेच राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, कमाल तापमानात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांतील तापमान घटले आहे आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :पाऊसहवामानमहाराष्ट्रविदर्भमराठवाडामोसमी पाऊस