Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update: केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा, या जिल्ह्यांत पावसाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 09:25 IST

राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (दि. १८) आणि शुक्रवारी (दि. १९) मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (दि. १८) आणि शुक्रवारी (दि. १९) मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना मात्र 'रेड अलर्ट' दिला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे.

केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कोकण-गोव्यात, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. दि. १९ व २० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल. राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही चांगला पाऊस होत आहे. राज्यातील धरणांत बऱ्यापैकी पाणीसाठा होत आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस होत असून, पूर्व भागात मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने भात लागवडही सुरू झाली आहे.

रेड, ऑरेंज अलर्ट कुठे?नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर आज (शुक्रवारी) नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये उद्या (दि. १९) दोन दिवस रेड अलर्ट' आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, त्यामुळे 'यलो अलर्ट' दिला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुढील दोन दिवस राज्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकणात काही भागात तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट' आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :पाऊसहवामानकेरळमहाराष्ट्रविदर्भमराठवाडा