Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; IMD ने दिला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 09:32 IST

Maharashtra Heatwave Alert: राज्यात तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यात पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. IMDने काय दिला अलर्ट वाचा

Maharashtra Heatwave Alert: मागील काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब होताना दिसत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पहाटे थंडी जाणवत आहे. मात्र सकाळी ८ नंतर उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आता उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली आहे.

IMD ने दिलेल्या माहिती नुसार, नंदुरबारसह काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांसह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवारी १४ तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाली आहे. दोन्ही ठिकाणीचे तापमान ४० अंशावर पोहोचल्याचे पहायला मिळाले. तर पुण्यात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. 

खरे तर, भारतात फेब्रुवारी (February) महिन्यांपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट कायम होती.

त्यानंतर मात्र आता हळूहळू हवामान बदलायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमानाने आता ४० अंश सेल्सिअसच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे.

डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी राज्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. साताऱ्यात ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सांगलीत ३५.४, रत्नागिरीत ३७.२, सोलापूर ३६.४, मुंबई (सांताक्रूझ) ३६.७, कोल्हापूर ३४, पुणे ३४.५ आणि ठाण्यात ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मागील आठवड्यापर्यंत या ठिकाणी तापमान सामान्य होते. मात्र मागच्या आठवडाभरात या जिल्ह्यातील तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसने वाढताना दिसत असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.

* डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात व्हॅलेंटाईन डे ला कसे असेल हवामान; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ