Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टी (Konkan coast) भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढलाय. मुंबईसहकोकणातील शहरे तापली आहेत. लोणावळ्यात (Lonavala) बुधवारी ३७ ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण, गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात येत्या २४ तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, मुंबई भागात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा कायम आहे. आज (२७ फेब्रुवारी) रोजी ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) यलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात ही तापमानस्थिती कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान राहणार आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील काही शहरांचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. तर पुण्यात शिवाजीनगर येथे ३६.२ अंश सेल्सिअस तर सर्वाधिक तापामनाची नोंद लोणावळ्यात ३७.६अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
उष्णतेची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (२६ फेब्रुवारी) बहुतांश महाराष्ट्रात तापमान प्रचंड वाढलेले होते. मराठवाडा, विदर्भात चांगलीच गरमी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होतेय. दरम्यान, येत्या ३ दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात २-३ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले (IMD Forecast) आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे तसेच येत्या पाच दिवसात कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे.
* वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.