Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होताना दिसत आहे. काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे तर काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस थंडीचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. सर्वाधिक कमी तापमान गोंदिया व नागपूर जिल्ह्यात नोंदविण्यात आले. या दोन्ही जिल्ह्यात ९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१३ डिसेंबर) रोजी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मन्नारचे आघात येथे निर्माण झाले आहे. तसेच त्याची वाटचाल वायव्य दिशेने होत असून पुढील १२ तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील चारही विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र, फारसा बदल होणार नाही.
पुण्यात पुढील ३ दिवस म्हणजेच १५ डिसेंबरपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस म्हणजेच १६ ते १८ डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईत गेले अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमान वाढलेले होते. मात्र, यंदा मागील ९ वर्षातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी तापमान मुंबईत नोंदविण्यात आले.
सध्या मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पालघर, नवी मुंबई या शहरांमध्ये गारठा वाढणार आहे. पुढील काही दिवस मुंबईत व उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात घट झाली आहे.
कोकणात थंडी वाढली
फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील थंडी गायब झाली होती. परंतु, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
विदर्भात थंडीचा जोर वाढला
विदर्भात सुद्धा थंडीचा जोर वाढला आहे. विदर्भात गोंदिया, नागपुर जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. तर अमरावती येथील चिखलदरा येथे तापमान ६ अंश सेल्सिअसवर आले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी धुक्यासह ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर सर्वात कमी तापमान गोंदिया जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे.
मराठवाडात कडाक्याची थंडी
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली असून मराठवाड्यातील तापमान हे १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. परभणी व बीड जिल्ह्यात किमान तापमान हे १३ अंश सेल्सिअस तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात किमान तापमान हे १४ अंश सेल्सिअस असेल.
तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
सध्या वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.