Join us

Maharashtra Weather Update : 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 09:27 IST

‘फेंगल’ चक्रीवादळाचा राज्याच्या हवामानावरही परिणाम झाला असून पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यात कहर केला आहे. पावसामुळे पुर आला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा राज्याच्या हवामानावरही परिणाम झाला असून पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडी गायब झाली असून तापमानात मोठी वाढ झाल्याचे जाणवत आहे. 'फेंगल' चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होऊन हे तापमान वाढले आहे.

आता या सोबत राज्यात पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, हवेत कमी झालेली आर्द्रता, कोरडे वातावरण व उत्तरेकडून येणारे वारे यामुळे राज्यात गारवा वाढला होता. गेले काही दिवस कडाक्याची थंडी नागरिक अनुभवत होते.

यंदा पुण्यात तर महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले होते. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या, आकडेवारीनुसार पुण्यात रविवारी १३.३ अंश सेल्सियस, तर सोमवारी १७.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ७ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येत आहे.

पावसाचा यलो अलर्ट

कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता व दमटपणा वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील चारही उपविभागात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी ५ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस शहरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील. राज्यात ५ आणि ६ डिसेंबर रोजी हलक्या ते अतिशय हलक्या पावसाची शक्यता असून इतर वेळी हवामान हवामान ढगाळ असेल, असे हवामान विभागाने कळविले आहे.

पुणे शहरातील कमाल तापमान २९.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले जे सामान्य पातळीवर आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. तसेच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असे हवामान विभागाने कळविले आहे.

लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत देखील किमान तापमान हे १२ अंश सेल्सिअस होते. तर जालना, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान हे १३ अंश सेल्सिअस राहणार आहे. लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे वतावरणीय प्रणाली झपाट्याने कमकुवत झाली आहे. यामुळे आर्द्रता वाढली आहे. तसेच किमान तापमानात वाढ झाल्यामु‌ळे थंडी कमी झाली आहे. ही स्थिती आणखी दोन-तीन दिवस राहू शकते. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होऊन थंडी पडू शकेल, असेही हवामान विभागाने कळविले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* डाळींब बागेत फळवाढीसाठी००:००:५० १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. * चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसपुणेमराठवाडाकोल्हापूरहवामान