Join us

Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:37 IST

आजचा हवामान अंदाज काय असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update: राज्यात परतीच्या पावसाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे आता पावसाचा जोर ओसरला आहे. आज काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

IMD ने दिलेल्या माहितीनुसार कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत आज (१ ऑक्टोबर) रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर वाऱ्याची द्रोणीय रेषा उत्तर कोकण ते आग्नेय उत्तर प्रदेश पर्यंत आहे. त्यामुळे आज विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आज ( १ ऑक्टोबर) आणि उद्या (२ ऑक्टोबर) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज कोकण, गोव्यात सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यात नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

तसेच विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुण्यात हवामान कोरडे

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर अधून मधून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* आज पावसाची उघडीप असल्याने शेतकऱ्यांनी काढणी आलेली पिकांची काढणी करुन घ्यावी. काढलेला शेतमाल हा कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. 

* पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कापूस आणि भाजीपाल्यांवर फवारणी करावी. 

* पशुंना बंधिस्त आणि सुरक्षित  ठिकाणी बांधावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसपुणेकोकणमुंबईमराठवाडा