Join us

Maharashtra Weather Update : वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे 'या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 09:29 IST

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. आज हवामान कसे असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update :

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. परंतू उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामाना  विभागाने वर्तविली आहे. आज शुक्रवारी(२७ सप्टेंबर) रोजी राज्यात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. 

मुंबई पुण्यासह विदर्भा, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. असे असले तरी आज (२७ सप्टेंबर) रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात असून या चक्रीय स्थितीपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर या चक्रीय स्थिती पासून कमी दाबाचा द्रोणीय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, गंगेय पश्चिम बंगाल मार्गे उत्तर बांगलादेशपर्यंत पसरला आहे. आज (२७ सप्टेंबर) रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर मराठवाड्यात आज बऱ्याच व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार तर छत्रपती संभाजी नगरच्या घाट विभागात खूप जोरदार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आज उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट

ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हा व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर उद्या जळगाव, बुलढाणा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज जोरदार व उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुणे व आसपासच्या परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला 

मराठवाडा, विदर्भा, मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमुग, मका, ज्वारी आदी पिकांची काढणी सध्या करू नये. 

तूर, मका, सुर्यफुल, भुईमुग, सोयाबीन आणि भाज्या या पिकांतील पावसाचे अतिरिक्त पाणी काढून टाकावे. 

तसेच पशुधन कोरड्या आणि बांधिस्त जागी बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडाविदर्भ