राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Weather) सातत्याने बदल (Change) होताना दिसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रात ऐन थंडीच्या मोसमात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज (२५ जानेवारी) रोजी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील. ज्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये आज कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तसेच साताऱ्यात कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअस असेल. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील तापमान गेल्या काही दिवसांपासून फार बदलताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारच्या वेळी तीव्र उन्हाचा तडाखा आणि रात्री उशीरा पुन्हा एकदा गारवा असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
* हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करता येते.
* हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होते. काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.