Pune : राज्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काल आणि आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पडलेल्या पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी या पावसामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे उन्हाळी पिके आणि फळबागांना नुकसान होणार आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. संपूर्ण राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. यासोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आला होता.
नाशिक, पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, साताऱ्याचा काही भाग, मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. पडलेल्या पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे जास्त फटका पिकांना बसणार नाही. पण बदललेल्या वातावरणामुळे मोठा फटका पिकांना बसणार आहे.