Water Shortage : पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटूनही लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने चिंता गडद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, तिरू प्रकल्प तर पूर्णपणे जोत्याखाली गेला आहे. (Water Shortage)
परिणामी, पाणीपुरवठ्याच्या योजना कोरड्या पडण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पावसाची आकडेवारी पाहता, यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.(Water Shortage)
मान्सूनची सुरुवात दमदार
मान्सूनपूर्व काही चांगल्या सरी कोसळल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा झाला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीस चांगल्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, मृग नक्षत्रानंतर पावसाने उघडीप दिली. आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले, तर आता पुनर्वसूही संपत आले असतानाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे जलसाठ्यांमध्ये घट होत असून, शेतकरी चिंतेत आहेत.
पिके माना टाकू लागली
पावसाचा ओघ मंदावल्यामुळे पिकांवर परिणाम दिसू लागला आहे. खरिपातील कोवळी पिके माना टाकू लागली असून सिंचनाच्या सोयी असलेले शेतकरी मोठ्या कष्टाने पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाचे लवकर आगमन न झाल्यास खरिपावर मोठे संकट ओढावण्याची भीती आहे.
मध्यम प्रकल्पांचा साठा कमीच
लातूर जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तिरू प्रकल्प पूर्णपणे कोरडा झाला आहे. उर्वरित ७ प्रकल्पांमध्ये मिळून फक्त २०.१५४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या १३४ तलावांमध्ये केवळ ६३.६९४ दलघमी पाणी शिल्लक आहे.
प्रकल्पनिहाय साठा (टक्केवारीत)
प्रकल्प | टक्केवारी |
---|---|
तावरजा | ८.१६% |
व्हटी | १३.०४% |
रेणापूर | २१.१७% |
तिरू | ००% |
देवर्जन | ७.७१% |
साकोळ | १७.९९% |
घरणी | ३६.४९% |
मसलगा | १५.२६% |
सरासरी (मध्यम प्रकल्प) | १६.५०% |
तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)
तालुका | पाऊस |
---|---|
लातूर | ८३.२ |
औसा | १२६.५ |
अहमदपूर | ११२.४ |
निलंगा | ११९.४ |
उदगीर | ११४.१ |
चाकूर | १२१.२ |
रेणापूर | १३२.५ |
देवणी | ११०.७ |
शिरूर अनंतपाळ | १०८.३ |
जळकोट | ९५.५ |
जिल्हा सरासरी | ११३.३ |
पावसाची प्रतीक्षा
मान्सून चांगला असल्याची खात्री होती, म्हणून खरिपाची तयारी केली. पण आता पाऊस नाही, प्रकल्प कोरडे, आणि पिके करपत चालली आहेत. पावसाने लवकर कृपा करावी, असे शेतकरी सांगतात.
लातूर जिल्ह्याला यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईसह पीकहानीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. पावसासाठी अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना शासनानेही वेळीच मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.