Vishnupuri Dam : नांदेड जिल्ह्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्याने जलसाठ्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. विशेषतः विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ६२.१० टक्के पाणीसाठा आहे. (Vishnupuri Dam)
आठवडाभरापूर्वी या प्रकल्पात ८५ टक्के साठा होता; मात्र, नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर तो काहीसा कमी झाला. सध्या दररोज पाण्याची आवक सुरू असल्याने हा प्रकल्प लवकरच पुन्हा पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.(Vishnupuri Dam)
पण अजून 'दमदार पावसाची' प्रतीक्षा
नांदेडकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी इतर प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. ढालेगाव धरणात सर्वाधिक ९८ टक्के पाणी आहे, तर आमदुरा, दिग्रस, आणि निम्न मानार प्रकल्प संथगतीने भरत आहेत. यंदा जूनमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या, मात्र जुलै महिन्यातील विश्रांतीमुळे शेतकरी चिंतेत होते. आता पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केल्याने पीक पुन्हा डोलू लागले आहे.
प्रमुख प्रकल्पांची पाणीसाठा स्थिती
प्रकल्पाचे नाव | उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) | टक्केवारी |
---|---|---|
आमदुरा | २.३० | ९.९१% |
निम्न मानार | ८१.०३ | ५८.६३% |
दिग्रस | ३८.९३ | ६१.२४% |
विष्णूपुरी | ५०.१७ | ६२.१०% |
ढालेगाव | १३.२३ | ९८.००% |
गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमीच
५ ऑगस्ट २०२४ पर्यंत नांदेड जिल्ह्यात ५०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदा २०२५ मध्ये ६ ऑगस्टपर्यंत केवळ ३४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अर्धा पावसाळा संपूनही अद्याप जिल्ह्यात दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाचे भरून जाणे हे जरी सकारात्मक चित्र दाखवत असले तरी जिल्ह्यातील इतर जलसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ होणे आवश्यक आहे. अजूनही अर्धा पावसाळा शिल्लक असतानाही, जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी नव्हे, पण सतत आणि संतुलित पावसाची अपेक्षा आहे.