Vidarbha Weather : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे पर्यटनस्थळ सध्या कडाक्याच्या थंडीने गारठून गेले आहे. मागील २० दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून रविवारी तळ ठोकत ३ डिग्री सेल्सिअस इतकी थंडी नोंदविण्यात आली. (Vidarbha Weather)
मंगळवारी पहाटे तापमान ७ डिग्रीपर्यंत खाली आले. मात्र राज्य सरकारकडून येथे अधिकृत तापमान मोजमाप केंद्रच नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे. (Vidarbha Weather)
सरकारी तापमान केंद्रच नाही!
सिपना महाविद्यालय चिखलदरा येथे बसविण्यात आलेल्या यंत्रावर रविवारी सकाळी ३°C इतकी नोंद झाली. तसेच मंगळवारी पहाटे किमान ७°C तर कमाल तापमान -१८°C इतकी नोंद मिळाल्याचे प्रा. विजय मंगळे यांनी सांगितले.
चिखलदरा हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च होतो; तरीसुद्धा राज्य शासनाच्या हवामान विभागाने येथे अधिकृत तापमान मोजणी केंद्र बसविलेले नाही. याबाबत स्थानिक व पर्यटक प्रचंड नाराज आहेत.
दिवसभर शेकोट्या; अंगावर शालशाली
परिसरातील थंडी एवढी तीव्र आहे की दिवसभर स्थानिकांना जाडजूड कपडे, मफलर, टोपी, मोजे घालावे लागत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक व हॉटेलधारक शेकोटी पेटवून थंडीचा मुकाबला करताना दिसतात.
पर्यटकांनाही अत्यंत थंड हवामानाचा अनुभव घेताना अक्षरशः कुडकुडावे लागत असून, यासाठी गरम कपडे सोबत आणण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे.
बरमासत्ती, कुकरू, सेमाडोह; सर्वत्र पारा खाली
चिखलदरा-धामणगाव गढी मार्गावरील बरमासत्ती, घटांग मार्गावरील मध्यप्रदेश सीमेजवळील कुकरू, तसेच व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह-माखला परिसरात दरवर्षी तापमान सगळ्यात कमी नोंदवले जाते.
येथे सकाळी दवबिंदू गोठण्याचे दृश्यही पाहायला मिळत असून, वातावरणात प्रचंड गारठा जाणवत आहे.
चिखलदऱ्यात तापमान केंद्र बसवणे अत्यावश्यक
अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी तापमान मोजण्यासाठी यंत्रे आहेत, पण चिखलदरा सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी यंत्रणा नसणे ही गंभीर बाब आहे. येथे अधिकृत केंद्र तातडीने बसविणे आवश्यक आहे.
चिखलदरा, हरिसाल, सेमाडोह परिसर संपूर्णपणे गारठून गेला असून, दिवसाही अंगावर शाल पांघरण्याशिवाय पर्याय नाही. पर्यटकांची संख्या वाढत असतानाही तापमान नोंदणीसाठी शासकीय पातळीवरील उदासीनता प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
