Vidarbha Weather Update : विदर्भात आषाढसरींनी अखेर जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांत संततधार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. (Vidarbha Weather Update)
पुढील दोन दिवसही काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Vidarbha Weather Update)
IMD ने वर्तविलेल्या अंदाजानुसार, सोमवारी विदर्भात आषाढ सरींनी सर्वदूर जोरदार हजेरी लावत मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू झालेली संततधार रात्रीपर्यंत थांबली नाही.
दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात सकाळपर्यंत पावसाने चांगलेच धुमशान घातले. गोंदियात दिवसा सुद्धा पाऊसधारा कायम होत्या. इतर जिल्ह्यातही दिलासादायक पाऊस झाला. (Vidarbha Weather Update)
जमिनीच्या संपूर्ण ओलाव्यासाठी शेतकऱ्यांना अशा पावसाची प्रतीक्षा होती. गोंदिया जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झोडपले. सोमवार सकाळपर्यंत शहरात सर्वाधिक ८५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. हे सत्र दिवसाही सुरू होते व सायंकाळपर्यंत २६ मि.मी. पावसाची नोंद झाली.(Vidarbha Weather Update)
जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या सर्व तालुक्यात पावसाची धुवाधार सुरू होती. या मुसळधार हजेरीने जिल्ह्यात नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. काही मार्गावर वाहतूकही खोळंबल्याची माहिती आहे. याशिवाय चंद्रपूर शहरात सकाळपर्यंत ५१ मि.मी. पाऊस नोंदविला गेला.
गोसेखुर्द प्रकल्पाचे २७ गेट उघडले
भंडारा जिल्ह्यात गेल्या १२ तासांपासून संततधार सुरू आहे. पाऊस जोराचा नसला तरी, संततधार पावसामुळे जलपातळी वाढत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता गोसेखुर्द प्रकल्पाचे २७ गेट उघडण्यात आले आहेत. त्यातून ११२५.१५ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
अकोला व वाशिम जिल्ह्यातही पावसाची हजेरी समाधान देणारी ठरली. विदर्भातील इतर जिल्ह्यातही पावसाच्या सरींनी चांगली हजेरी लावली. बुलढाण्यात सकाळपर्यंत २९.२, तर सायंकाळपर्यंत २३ मि.मी. पाऊस झाला.
यवतमाळला सकाळपर्यंत २४ मि.मी. नोंद झाली. अमरावतीत दिवसा १३ मि.मी. पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून हलका पाऊस होत आहे. यामध्ये सरासरी ४.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ टक्के पावसाची तूट आहे.
गडचिरोली शहरात सकाळपर्यंत ४३ मि.मी. नोंद झाली. धानोरा सर्कलमध्ये ६२.२ मि.मी. पाऊस झाला. दोन्ही जिल्ह्यात सोमवारी दिवसभर काही अपवाद वगळता पावसाने उसंत घेतली.
नागपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू झालेल्या आषाढसरींची संततधार रात्रीपर्यंत न थांबता अविरतपणे सुरू होती. सकाळपर्यंत १३ मि.मी. पावसाच्या नोंदीनंतर सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही संततधार रात्रीही कायम होती.
पुढचे दोन दिवसही मुसळधार
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार विदर्भात पुढचे दोन दिवस काही ठिकाणी अतिजोरदार ते अत्याधिक ओरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व यवतमाळ जिल्ह्यात २४ तासात काही भागात अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. अमरावती जिल्ह्यात ८ , ९ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.