अमरावती : विदर्भात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने अक्षरशः कहर केला असून, अमरावती आणि वर्धा जिल्हे देशातील सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या शहरांमध्ये अव्वल ठरले आहेत.(Vidarbha Heat Wave Update)
शुक्रवारी अमरावती व वर्धा येथे प्रत्येकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ही दोन्ही शहरे देशात 'हॉट अँड टॉप' ठरल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.(Vidarbha Heat Wave Update)
याशिवाय अकोल्यात ४४.१ अंश, तर नागपूर आणि वाशिममध्ये ४४ अंश तापमानाची नोंद झाली. (Vidarbha Heat Wave Update)
विशेष म्हणजे, छत्तीसगडमधील राजनांदगाव वगळता देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या पाच शहरांपैकी चार शहरे विदर्भातील आहेत. (Vidarbha Heat Wave Update)
या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यासाठी १९ एप्रिलपर्यंत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हवामानातील बदलांची कारणे
हवामानतज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ सक्रिय असून आणखी एक विक्षोभ हिमालयावर येण्याच्या मार्गावर आहे.
त्याचबरोबर भूमध्य समुद्र परिसरात तसेच हरियाणा, बांगलादेश, ईशान्य मध्य प्रदेश आणि कर्नाटक भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भ ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाची द्रोणीय रेषा सक्रिय असल्याने उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे.
२० एप्रिलपर्यंत उष्णतेचा जोर कायम
या सर्व परिस्थितीमुळे विदर्भात २० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, १९ एप्रिलपासून वातावरणात ढगाळपणा वाढेल आणि २० एप्रिलनंतर तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता
२०, २१ आणि २२ एप्रिल दरम्यान पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे विदर्भात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
उष्माघाताचा धोका वाढला
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी होत असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.
चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी, शरीराचे तापमान अचानक वाढणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत.
अशा लक्षणांची जाणीव झाल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ सावलीत नेऊन थंड पाण्याने अंग पुसावे आणि शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
काळजी घेणे आवश्यक
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि डोक्यावर संरक्षण (टोपी/ओढणी) वापरावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
