Sina River Flood : असं म्हणतात, जब नदिया अपनी जमीन माँगती है, तो किसी पटवारी की जरुरत नहीं पड़ती। हे वाक्य आजच्या निसर्गातील बदलावरून लक्षात येतंय. ज्या पद्धतीने मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला. अन् शेतीचं नुकसान झालंच, शिवाय घर, संसार देखील उध्वस्त झाला. येथील केवळ दुथडी भरून वाहणाऱ्या सीना नदीने अनेकांना पोटात घेत आपला रुद्रावतार दाखवून दिला. कधी नव्हे तो सीना नदीला एवढा महाकाय पूर असल्याचे येथील शेतकऱ्यांचे तोंडून आपण ऐकले.
खऱ्या अर्थाने यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला मराठवाड्याचा बहुतांश भाग कोरडाठाक दिसत होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसाने सगळी धरणे काठोकाठ भरली. अनेक नद्यांना पूर आला. पूरही असा तसा नाही तर मराठवाड्याने कधीही अशा पुराची अपेक्षा केली नव्हती, असा पूर आला. अन् होत्याचं नव्हतं करून केला. यामध्ये बीड, सोलापूर, परभणी, धाराशिव या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील अनेक वर्षांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
इथली सीना नदी म्हणजे शांत अन् संयमाने वाहणारी नदी. या नदीचा इतिहास पाहिला तर तिचा उगम हा अहिल्यानगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील. पाणलोट क्षेत्रामधील प्रदेशामध्ये अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. सीना नदी ही भीमा नदीची एक उपनदी असून लांबी सु. ३७५ किमी आहे. पाणलोट क्षेत्र सुमारे १२ हजार हजार ७४२ चौ. किमी पर्यंत आहे.
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे. ही नदी अहिल्यानगरसह धाराशिव जिल्ह्यामधील परांडा तालुका ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे. सीना-कोळेगाव योजनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावापासून २ किमी अंतरावर जाऊन मिळते. पुढे येऊन सिना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते. ती नदी करमाळा येथे येऊन माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. पुढे माढा-वैराग रोड या गावातून जातो. सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन्ही किनाऱ्यावर असणाऱ्या उंदरगाव आणि केवड या गावांना जोडतो.
अन् याच सीना नदीने यंदा मात्र रौद्र रूप येथील शेतकऱ्यांना दाखवून दिले. या सगळ्या काळात नदीने बरंच काही वाहून नेलं. शेतकऱ्याकडे होत नव्हतं सगळं नेलं. या पावसानं मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर येऊन भीषण परिस्थिती झाली. महापुराने सगळंच ओरबाडलं. या सगळ्या संकटातून शेतकऱ्यांना लढण्याचं बळ मिळो, एवढीच अपेक्षा...