मुंबई : राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात(Rain Alert) रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट (Orange ALert) देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याकडून १७ ते २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
या दरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून खेड शहरातील जगबुडी नदीचे पाणी खेड – दापोली रस्त्यावर आल्याने खेड शहरांतून दापोलीकडे जाणारी वाहतूक सुरक्षास्तव बंद करण्यात आली आहे आणि जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत २८,०७५ क्युसेक्स तसेच यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात ५४,४६६ क्युसेक इतका विसर्ग सूरू आहे.
प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Read More : आज 16 ऑगस्टपर्यंत 'ही' धरणे 100 टक्के भरली, इतर धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर