गोंदिया : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, मार्च महिन्यातच पारा ३९ अंशांवर गेला आहे. परिणामी नदी-नाले कोरडे पडू लागले आहेत. अशातच शहराची तहान भागविणाऱ्या वैनगंगा नदीनेही तळ गाठला आहे.
सद्यस्थितीत नदीपात्रात पुढील १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी उन्हाळ्यातही साथ देणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र यंदा लवकरच कोरडे पडल्याने मे महिन्यात काय, असा प्रश्न शहरवासीयांना सतावत आहे.
शहराला तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदी पात्रात उभारलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळे वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते. मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम पडतो. यामुळे उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते.
त्यातही आता उन्हाळा रंगात आला असून, तापमान ३९ अंशांवर जात आहे. तरीही वैनगंगेने मार्च महिना काढून दिला आहे. आता वैनगंगा नदी पात्रात केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे अर्धा एप्रिल व मे आणि जून महिन्यात काय होणार, अशी चिंता शहरवासीयांना सतावत आहे.
पाणी अडविण्यासाठी बांधावा लागतो बंधारा
उन्हाळा लागताच वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नदी पात्रात बंधारा बांधला जातो. या बंधाऱ्याची भरपूर साथ मिळत असून, त्याद्वारे काही दिवस पाण्याची सोय होते. अशात यंदाही मजीप्राला बंधारा बांधावाच लागणार आहे.
पाणी जपून वापरा
वैनगंगा नदी पात्रात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिस्थिती कठीण असून, अर्था एप्रिल आणि त्यानंतर मे व जून महिना काढायचा आहे. अशात नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता जपूनच पाणी वापरावे, असे मजीप्राने कळविले आहे.
गोंदियासह कुडवा व कटंगीलाही पाणीपुरवठा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीलाही पाणीपुरवठा केल जातो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सुमारे २२ हजार नळ कनेक्शनधारक आहेत. वैनगंगेने साथ सोडल्यास मात्र त्याचा फटका गोंदिया शहरासह कुडवा व कटंगी या दोन्ही गावांतील नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.
पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण
दरवर्षी उन्हाळ्यात वैनगंगा नदीतील पाणी संपत असून, पुजारीटोला प्रकल्पातून मजीप्राला पाणी आणावे लागते. यामुळे मजीप्राने त्यानुसार नियोजन केले असून, पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षप केले आहे. नदीतील संपल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जात असून, त्याद्वारे गोंदिया शहर व कुडवा आणि कटंगी या दोन गावांची तहान भागविली जाते.
