नाशिक : राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शिवाय पुढील ३ तासात नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील मराठवाडा विभागात पावसाने कहर केला असून शेतीसह घरे देखील पाण्याखाली गेली आहेत. शिवाय जनावरे देखील मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातही पाऊस सुरु झाला असून पुढील ३ तासात नाशिक या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने अनेक धरणांमधून विसर सुरु करण्यात आला आहे. गंगापूरसह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे धरण परिसरातील नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारी आवक बघता पुढील कालावधीत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गंगापूरसह विसर्ग सुरु असलेल्या धरण नदीकाठच्या नागरीकांना नदीप्रवाहात कोणीही जावू नये, तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग
दारणा - १४०० क्युसेक, गंगापूर - ४ हजार १८ क्युसेक, नांदुरमध्यमेश्वर - ९ हजार ४६५ क्युसेक, पुणेगाव - १९५० क्युसेक, करंजवण १३५४ क्युसेक, पुनद (अर्जुन सागर) - ६ हजार ८०० क्युसेक, चणकापूर धरण - १७ हजार ९९७ क्युसेक, गिरणा धरण - १२ हजार ३८० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. शिवाय इतरही धरणांमधून काही प्रमाण विसर्ग सोडण्यात आला आहे.