Marathwada Red Alert : मराठवाड्यावर पावसाचे संकट अजूनही कायम असून हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज शनिवारी (२७ सप्टेंबर) आणि उद्या रविवारी (२८ सप्टेंबर) या दोन दिवसांसाठी विभागातील आठही जिल्ह्यांत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.(Marathwada Red Alert)
या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपले आहे. अनेक ठिकाणी मनुष्यहानी, पशुधनहानी, तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Marathwada Red Alert)
पावसाचा कालावधी आणि जिल्हानिहाय अंदाज
२७ सप्टेंबर (शनिवार)
सकाळी ८ ते दुपारी २: नांदेड, लातूर
दुपारी २ ते रात्री ८: धाराशिव, लातूर, नांदेड
रात्री ८ ते मध्यरात्र: धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी
२८ सप्टेंबर (रविवार)
मध्यरात्र ते सकाळी ६: छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड
सकाळी ६ ते दुपारी १२: छत्रपती संभाजीनगर, बीड
दुपारी १२ ते संध्याकाळी ६: छत्रपती संभाजीनगर
प्रशासनाची तयारी
हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून निचांकी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
* नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे
* नद्या, ओढे, नाले याठिकाणी पुराचा धोका असल्याने सावध राहावे
* शेतकऱ्यांनी शक्यतो पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी
* प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचना आणि अलर्टची तातडीने दखल घ्यावी
मराठवाड्यात पावसामुळे गेल्या काही दिवसांतच काही गावांमध्ये शाळा बंद ठेवावी लागली, तर वाहतूक व वीजपुरवठा खंडित झाल्याचेही प्रकार घडले. अशा परिस्थितीत हवामान विभागाने दिलेल्या या रेड अलर्टमुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पिके वाचवण्यासाठी पाणी साचू नये याकडे विशेष लक्ष द्यावे.
* धान्य, बियाणे, औषधे आणि खते कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
* शेतावर अनावश्यक जाणे टाळावे.
* वीज चमकणे किंवा वादळी वारे यावेळी मोकळ्या शेतात थांबू नये.