Marathwada Rain : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दि. २० ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर दि. २१ ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दि. २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक २४ ते ३० ऑक्टोबर, २०२५ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.