Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा एकदा जलप्रलय ओसंडून वाहत आहे. तब्बल १४१ मंडळांतील २ हजार ८८० गावे अतिवृष्टीने जलमय झाली आहेत. (Marathwada Floods)
लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव व बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने रस्ते ठप्प, घरे कोसळली तर शेतकरी-व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत. प्रशासन व बचावपथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. (Marathwada Floods)
पूरस्थिती आणि सततच्या पावसाने त्रस्त झालेल्या मराठवाड्याला शनिवारी (२८ सप्टेंबर) पुन्हा एकदा अतिवृष्टीने झोडपून काढले. नद्या-नाल्यांना पूर येऊन प्रकल्पांमधून विसर्ग सुरू झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. (Marathwada Floods)
अनेक ठिकाणी रस्ते ठप्प झाले, गावांचा संपर्क तुटला, जनावरांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.(Marathwada Floods)
१४१ मंडळांवर आपत्तीचा मारा
शनिवारी मराठवाड्यातील १४१ मंडळांतील तब्बल २ हजार ८८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात किरकोळ पाऊस पडला असला तरी, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव व बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. विभागात दिवसभरात सरासरी ४१ मिमी पावसाची नोंद झाली. लातुरात सर्वाधिक ७५.३ मिमी पाऊस झाला.
हिंगोली : ५० नागरिकांची सुटका
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे सावडण्याच्या कार्यक्रमावरून परत येणारे सुमारे ५० नागरिक पूरपाण्यात अडकले. स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत दोरीच्या साह्याने सर्वांना बाहेर काढले. गावालगतचा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ओढ्याला पूर आला आणि नागरिक शेतात अडकले होते.
धाराशिव : परांडा आणि भूमला फटका
धाराशिव जिल्ह्यात परांडा व भूम येथे मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे स्थलांतर सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथके पुण्याहून रवाना करण्यात आली आहेत.
बीड : २० मंडळांत अतिवृष्टी, १४३ घरे पडली
बीड जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये सरासरी ६५ मिमी पावसाची नोंद झाली. केज तालुक्यात ४५ गावांचा संपर्क तुटला आहे. १४३ घरे पडल्याने नागरिक बेघर झाले. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे पूरात अडकलेल्या ७ जणांची सुटका एनडीआरएफने केली.
लातूर : ६० रस्ते ठप्प
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, छिलखा बॅरेज परिसरात अडकलेल्या चौघांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. जिल्ह्यात तब्बल ६० रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) पथक नांदेडहून लातूरला रवाना करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय अतिवृष्टी
बीड : २० मंडळे प्रभावित
लातूर : १८ मंडळे प्रभावित
धाराशिव : ३८ मंडळे प्रभावित
नांदेड : २५ मंडळे प्रभावित
परभणी : २१ मंडळे प्रभावित
हिंगोली : १९ मंडळे प्रभावित
एकूण : १४१ मंडळे – २ हजार ८८० गावे
जनजीवन विस्कळीत
पूरामुळे शेकडो गावे अंधारात बुडाली आहेत. रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली, तर व्यापाराचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक जनावरे वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.