Manjara Dam Water Storage : बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरण ९० टक्के भरले असून खबरदारी म्हणून चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, संततधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण शनिवारी दुपारी २ वाजता ९० टक्के क्षमतेने भरले.
खबरदारी म्हणून धरणाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, ३४९४ क्युसेक (९८.९६ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
धरणातील आवक वाढली
गुरुवारी रात्री धरणाच्या वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शुक्रवारी पहाटेपासूनच मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली. शनिवारी दुपारी धरणात तब्बल ५.५६७ दलघमी (५१५.४६ क्युमेक्स) पाण्याची आवक नोंदवली गेली. त्यामुळे धरण ९० टक्के भरताच १, ३, ४ आणि ६ असे चार वक्रदरवाजे उघडण्यात आले.
१७ वेळा पूर्ण क्षमतेने भरलेले धरण
वर्ष १९८०-८१ मध्ये पूर्ण झालेले मांजरा धरण यापूर्वी १६ वेळा पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा ही १७ वी वेळ असून, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.
कळंबचा शेतकरी पुरात वाहून गेला
जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील १७ महसुली मंडळांत अतिवृष्टी नोंद झाली आहे.
अतिदक्षतेचा इशारा
धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने कोणत्याही वेळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना अतिदक्षतेचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता अनुप गिरी यांनी दिली.
मांजरा नदीला पूर; कर्नाटकही अलर्ट
धरणाचे चार दरवाजे उघडल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या खेड्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १७ महसुली मंडळांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
पाली : ७७.५ मिमी, नाळवंडी : ६८.३ मिमी, चौसाळा : ८०.५ मिमी, नेकनूर : ७४ मिमी, लिंबागणेश : १०७.८ मिमी
पाटोदा : १०२.८ मिमी, थेरला : ६५.८ मिमी
धोंडराई : ८२.८ मिमी, रेवकी : ८२.८ मिमी, तलवाडा : ६९.८ मिमी
युसुफ वडगाव : ६५ मिमी, बनसारोळा : ८२.५ मिमी, नांदूरघाट : ७०.८ मिमी
नागापूर : ७४ मिमी, सिरसाळा : ७१.३ मिमी
तितरवणी : ८०.८ मिमी, ब्रह्मनाथ येळंब : ७६.५ मिमी